सात वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्यास २० वर्षे सक्तमजूरी


वडापाव खाऊ घालण्याच्या बहाण्याने सात वर्षीय बालिकेला तिच्या आईकडून बळजबरी घेऊन जाऊन रात्रीच्या वेळी शेतात मारहाण करत अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस पोक्सोसह इतर विविध कलमांखाली २० वर्षे सक्तमजूरी व ८९ हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष जिल्हा सत्र न्यायाधीश के. आर. चौधरी यांनी सोमवारी सुनावली. बंडू रोहिदास राठोड असे त्या आरोपीचे नाव आहे. दंडाच्या रकमेपैकी २० हजार रुपये पीडितेला नुकसान भरपाई म्हणून देण्याचेही आदेशात म्हटले आहे. चिकलठाणा पोलिस ठाणे प्रमुख असताना सत्यजित ताईतवाले यांनी या प्रकरणाचा पर्दाफाश केला होता.

मात्र प्रकरण हे मुकुंदवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्याने याप्रकरणी पीडितेच्या आईने मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात ३१ जुलै २०१८ रोजी तक्रार दाखल केली होती. बंडू याने ३० जुलै २०१८ रोजी पीडितेला तिच्या आईला सांगून व परत आणून देतो म्हणून घरातून नेले, मात्र बराच वेळ झाल्यानंतरही पीडिता व बंडू राठोड परतला नसल्याने फिर्यादीने जयभवानीनगरात शोधही घेतला. 

दुसरा दिवस उजाडला तरी आला नसला तरी मुलीला आणून सोडेन या विश्वासाने फिर्यादी मयूरपार्क येथे कामाला गेली. तिचा शोध घेऊन चिकलठाण्याचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी पीडितेला फिर्यादीकडे सोपवले. यावेळी पीडितेने राठोड याने गिरनार तांडा भागात नेऊन आपल्याला पोटात, डोक्यात मारहाण करून नैसर्गिक व अनैसर्गिक कृत्य केल्याचे सांगितले.

Post a Comment

0 Comments