सोलापूर/प्रतिनिधी:
सोलापुरातील शिवसेनेत खळबळ माजली आहे. एका नेत्याने दुस-या नेत्यावर एक नव्हे दोन नव्हे तर पाच कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. त्यामुळे चांगलीच खळबळ माजली आहे. मात्र या प्रकारामुळे शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे (वय ६१, रा. अवंती नगर, जुना पुणे नाका) यांनी नगरसेवक मनोज भास्कर शेजवाल (वय ४७, रा. रेल्वेलाईन, महापौर बंगल्याजवळ) यांच्याविरुद्ध क्रिमिनल प्रोसीजर कोड कलम १९० अन्वये व इंडियन पिनल कोड कलम ५००,५०१ अन्वये पाच कोटी रुपयांचा फौजदारी खटला दाखल केला असल्याचे जिल्हाप्रमुख बरडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.
शिवसेनेत सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी आणि परिवहन सभापती निवडीवरून शिवसेनेत अंतर्गत धुसफूस सुरू होती. त्यावेळी प्रभारी जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक आणि विरोधी पक्षनेते यांनी विश्वासघात केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेना नगरसेवक मनोज शेजवाल यांनी २३ फेब्रुवारी रोजी जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्याविरोधात पत्रकार परिषद घेतली.
नगरसेवक मनोज शेजवाल पत्रकार परिषदेत म्हणाले, आजपर्यंत बरडे यांनी विरोधकांशी हातमिळवणी करून शिवसेनेचा आणि पक्षप्रमुखांचा विश्वासघात केला आहे. बरडे हे पक्ष संपवायला निघाले आहेत. त्यांच्याविषयी मातोश्रीवर गाऱ्हाणं मांडलं जाईल, असा इशाराही त्यांनी दिला होता.
मनोज शेजवाल यांच्या आरोपांनंतर शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी मात्र थेट सोलापूर येथील मे. चिफ ज्युडिशियल मजिस्ट्रेट वर्ग १ यांच्या कोर्ट नं १ यांच्याकडे दावा दाखल केला. नगरसेवक मनोज शेजवाल यांनी मानहानी केल्याचा आरोप बरडे यांनी केला आहे. त्यामुळे त्यांनी ५ कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला आहे.
फिर्यादीत काय म्हटले ?
आपल्या दाव्यात पुरुषोत्तम बरडे यांनी सांगितलं की, नगरसेवक मनोज शेजवाल हे शिवसेना पक्षाचे नगरसेवक असून, मोहोळ विधानसभा मतदारसंघातून २०१९ साली पक्षाच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आहे. त्यामुळं पक्षानं त्यांच्या विरुद्ध निलंबनाची कारवाई केली आहे. शेजवाल यांच्यावर कुंटणखाना चालवत असल्याबद्दलही गुन्हा दाखल आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. शेजवाल यांनी पत्रकार परिषद घेत माझ्या विरोधात अनेक खोटे आरोप केले आहेत. विविध दैनिकात तसंच वृत्तवाहिन्यांवर माझ्याविरुद्ध बदनामीकारक आरोप प्रसिद्ध झाले आहेत.
यामुळे माझी बदनामी होऊन माझी राजकीय कारर्कीद धोक्यात यावी, माझा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमधील आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांमधील विश्वास संपावा या हेतूने केवळ मानहानी व बदनामी केली आहे. त्यामुळं मला मानसिक त्रास झाला असून, नगरसेवक मनोज शेजवाल याला कडक शासन किंवा शिक्षा होणं गरजेचं आहे, असं बरडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
0 Comments