भाजप महिला नेत्याला अश्लील मेसेज करून त्यांच्या फोटोला मोर्फ करत नाहक बदनामी करणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांच्या सायबर पोलिसांनी यवतमाळ येथून अटक केलेले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव राहुल तुळशीराम अडे, असे असून यवतमाळमधील घाटंजी येथील तो रहिवासी आहे.
या प्रकरणी पीडित भाजप महिला नेत्याने २ मार्चला मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाकडे तक्रार दिली होती . पूजा चव्हाण या युवतीच्या मृत्यूप्रकरणी गेल्या काही दिवसांपासून भाजप महिला नेत्या या पोलिसांकडून कारवाईची मागणी करत होत्या. या संदर्भात गेल्या काही दिवसांपासून त्यांना अश्लील मेसेज व धमकी देणारे फोन येत असल्याची तक्रार त्यांनी मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाला केली होती. या संदर्भात सायबर पोलिसांकडून तपास केला जात असताना ते फोटो व्हायरल करणाऱ्या आरोपीचा आयपी ऍड्रेस शोधून त्याच्या मोबाईल लोकेशन पोलिसांकडून हेरून त्याला अटक करण्यात आलेली आहे. संशयितास न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी १३ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत करण्यात आलेली आहे.
पूजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यूनंतर यासंदर्भात महाविकास आघाडीच्या एका नेत्याच्या विरोधात संबंधित भाजप महिला नेत्या या कारवाईची मागणी करत होत्या. सध्या सुरू असलेल्या अधिवेशनाच्या अगोदर महाविकास आघाडीतील या मंत्र्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा स्वीकारलेला आहे. यासंदर्भात पुणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.
0 Comments