मोहिते-पाटील गटातील सहा जिल्हा परिषद सदस्यांना तात्पुरता दिलासा

 
सोलापूर/प्रतिनिधी:

सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराविरोधात बंडखोरी करणाऱ्या माळशिरस तालुक्यातील मोहिते पाटील गटाच्या जिल्हा परिषद सदस्यांची सुनावणी उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मंगळवारी पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर झाली.


मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी होती. मात्र सुप्रीम कोर्टात प्रकरण प्रलंबित असल्याने जिल्हाधिकारी स्तरावरील सुनावणी थांबवण्याची मागणी मोहिते-पाटील गटाने केली होती. मोहिते-पाटील गटाचा युक्तिवाद जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी मान्य केला आणि सुनावणीची पुढची तारीख दिली.

सहा सदस्यांना त्यावेळीही तात्पुरता दिलासा मिळाला होता, तरी उच्च न्यायालयाने हा विषय पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवला. माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्य स्वरुपाराणी मोहिते-पाटील, शितला देवी मोहिते-पाटील, अरुण तोडकर, मंगल वाघमोडे, सुनंदा फुले आणि गणेश पाटील या सदस्यांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीविरोधात बंडखोरी केली होती.

काँग्रेस आणि शिवसेनेचे सदस्य फोडून भाजप आणि मोहिते पाटील गटाने थेट आपला अध्यक्ष जिल्हा परिषदेवर बसवला होता. मोहिते पाटील गटाचे अनिरुद्ध कांबळे अध्यक्षपदी विराजमान झाले, तर औताडे गटाचे दिलीप चव्हाण उपाध्यक्ष झाले.

Post a Comment

0 Comments