उस्मानाबाद : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघासाठी घेण्यात येणारे मतदान ईव्हीम मशीन ऐवजी ते छापील मत पत्रिकेवर घेण्यात येत आहे. या निवडणूकीत मत पत्रिका हिशोब लिफाफा, केंद्र अध्यक्षाची दैनंदिनी लिफाफा, कागदी मोहरांचा हिशोब लिफाफा, झालेल्या मतदानाच्या टक्केवारीचा लिफाफा, सुरक्षा शीट व मतदाना दिवशी केंद्र परीसरात झालेल्या सर्व घटनांचा उल्लेख असलेला लिफाफा अशा सहा लिफाफ्याबरोबरच मतपेटी हा निवडणूकीचा आत्मा असून याबाबत सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले.
येथील नगरपरिषदेच्या शिवाजी महाराज नाटयगृहात ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघासाठी क्षेत्रिय अधिकारी, मतदान केंद्र अध्यक्ष व मतदान अधिकारी यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षणात जिल्हाधिकारी दिवेगावकर मार्गदर्शन करत होते. यावेळी औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयातील विकास व नियोजनचे उपायुक्त अविनाश गोटे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार फड, अप्पर जिल्हाधिकारी रूपाली आवले, निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ.चारूशिला देशमुख, पुनर्वसन विभागाच्या उपजिल्हाधिकारी शुभांगी आंधळे, उपविभागीय अधिकारी विठठल उदमले (उमरगा), अहिल्या गाठाळ (कळंब), मनीषा राशिनकर (भूम) यांच्यासह सर्व तहसिलदार व नायब तहसिलदार उपस्थित होते.
पुढे बोलताना दिवेगाकवर म्हणाले की, मतदान अधिकाऱ्यांनी मतदानाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन व हलगर्जीपणा होणार नाही याची दक्षता घ्यावी. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी क्षेत्रीय अधिकारी क्षेत्रीय अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात येत असून या प्रशिक्षणात मतदानाच्या अनुषंगाने सर्व बाबींची माहिती संबंधितांनी घ्यावी. हे पहिले प्रशिक्षण अत्यंत महत्वाचे आहे. उर्वरीत दोन प्रशिक्षण ही महत्वाची असून सर्व अधिकाऱ्यांनी वेळेवर उपस्थित राहावे. कोणीही टाळाटाळ करू नये, असे त्यांनी सूचित केले.
विशेष म्हणजे कोरोनाच्या नावाखाली कोणीही मनाने क्वॉरंटाईन व्हायचे नाही तुमच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जिल्हा प्रशासन दक्ष असून ॲन्टेजन तपासणीसह आरटीपीसीआर तपासणी करून घेण्यात येणार आहे. निवडणूकीसाठी आवश्यक असलेले साहित्य व्यवस्थित वाटुन घेऊन ही निवडणूक अतिशय गंभीरपणे घेऊन ही प्रक्रिया कोणत्याही परिस्थतीत पारदर्शक वातावरणात पार पाडायची आहे. तसेच आपणासाठी कोरोनासह नैसर्गिक म्हणजेच अवकाळी पावसाचा असा अवघड काळ आपल्या जिल्हयाने पार पाडलेला आहे. त्यामुळे निवडणूकीचे हे काम देखील सर्वांनी निर्विघ्नपणे पार पाडावे अशी अपेक्षाही जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी व्यक्त केली.
यावेळी बोलताना डॉ.प्रताप काळे म्हणाले की, ही निवडणूक छोटी दिसत असली तरी ती लोकसभा व विधानसभा निवडणूकी सारखी मोठी असून प्रत्येकांनी गार्भीयपूर्वक काम करणे आवश्यक आहे. मतदान केंद्रस्थळी जाण्यापूर्वी आवश्यक असलेले सर्व साहित्य घेताना मतपत्रिका, मतदार यादी, पेन यासह आवश्यक असलेले सर्व साहित्य व्यवस्थित आहे किंवा नाही ? हे पहावे. तसेच केंद्र अध्यक्ष हा मतदान केंद्राचा प्रमुख असल्यामूळे सर्व सहकार्ऱ्याना सोबत घेऊन केंद्रस्थळी मुक्कामी राहाणे बंधनकारक आहे. कोणत्याही अधिकाऱ्याने एकही चुक केल्यास ती खपवून घेतली जाणार नसून मतदान केंद्र परीसरात पोलिसांना मतदान सुरू असताना कुठल्याही प्रकारच्या बातम्या वाचण्यासाठी दैनिक पेपर वापरण्यास प्रतिबंध करणे आवश्यक असल्याचे सांगुन ते म्हणाले की, मतदान अधिकाऱ्यांनी डायरी लिहीताना वेळच्यावेळी प्रत्येक घटनेचा डायरीमध्ये स्पष्टपणे उल्लेख करणे महत्वाचे असून डायरी हीच मतदान केंद्राचा आरसा आहे असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी विभागीय आयुक्त औरंगाबाद तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुनिल केंद्रेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी लातूर कार्यालयाच्यावतीने या निवडणूकी संदर्भात तयार करण्यात आलेल्या व्हिडीओ क्लिपच्या माध्यमातून आदर्श मतदान केंद्राची रचना कशी असावी, मतदान पेटी कशा प्रकारे सील करावी व इतर अनुषंगिक माहिती देण्यात आली. या प्रशिक्षणासाठी सर्व क्षेत्रिय अधिकारी,मतदान केंद्र अध्यक्ष व मतदान अधिकारी सुरक्षित अंतर ठेवून उपस्थित होते. सुत्रसंचलन नायब तहसिलदार चेतन पाटील यांनी तर उपस्थितांचे आभार नायब तहसिलदार पंकज मंदाडे यांनी मानले.
चौकट
०५-औरंगाबाद पदवीधर मतदार संघाच्या अनुषंगाने आज येथे आयोजित पहिल्या प्रशिक्षण कार्यक्रमास गैरहजर असलेल्या ८ मतदान केंद्राध्यक्ष व १० मतदान अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येऊन पुढील कारवाई होणार आहे. तरी यापुढील कोणत्याही प्रशिक्षणास संबंधित अधिकाऱ्यांनी अनुपस्थित राहू नये असे आव्हान जिल्हा निवडणूक प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.
0 Comments